Wakad : हॉर्न वाजविल्यामुळे दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यात एक टेम्पो अचानक थांबला. टेम्पो चालकाला टेम्पो पुढे घेण्यासाठी दुचाकीस्वाराने हॉर्न वाजविला. या कारणावरून चिडलेल्या टेम्पोतील तीन जणांनी दुचाकीस्वारास हेल्मेट आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी ताथवडे येथे घडली.

शैलेश कुमार सिंग (वय 28, रा. कुमार पिकाडीली, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पोमधील तीन अनोळखी व्यक्‍तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. त्यांच्यापुढे चाललेल्या टेम्पो चालकाने अचानक रस्त्यात टेम्पो थांबविला. यामुळे शैलेश यांनी रस्त्यात थांबलेला टेम्पो पुढे घेण्यासाठी हॉर्न वाजविला. या कारणावरून टेम्पोतून तीनजण खाली उतरले. त्यांनी शैलेश यांना सुरवातीला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्‍यातील हेल्मेट काढून त्याने मारहाण केली. एवढ्यावरच आरोपी थांबले नाही. त्यांनी टेम्पोतून लोखंडी रॉड काढून त्यानेही फिर्यादी शैलेश यांना बेदम मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.