Wakad : दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला पूर्ण बिल भरण्याची सक्ती; रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रुग्णाला उपचारानंतर डिस्चार्ज दिला. रुग्णाने दारिद्र्य रेषेखालील कागदपत्रे सादर केली तरीदेखील रुग्णालय प्रशासनाने बिलाची संपूर्ण रकमेची मागणी केली. तसेच रुग्णाला नातेवाईकांपासून दूर ठेवले, यावरून चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय दशरथ आरडे (वय 38, रा. कैलासनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या अधिकारी रेखा दुबे, राजेश दुबे आणि हॉस्पिटलमधील बाऊंसर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यांच्या वडिलांना आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी संजय यांनी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतची कागदपत्रे रुग्णालय प्रशासनाकडे सादर केली. त्यावरून रुग्णालयाच्या बिलमध्ये सूट मागितली. परंतु रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण बिलाची मागणी केली. संपूर्ण बिल मिळत नसल्याने आरोपींनी संजय यांच्या वडिलांना डांबून ठेवले. त्यांना उपाशी ठेवले. तसेच नातेवाईकांना देखील भेटू दिले नाही. रेखा आणि राजेश यांनी संजय यांना पूर्ण बिल भरा अन्यथा त्यांच्या वडिलांना सोडणार नसल्याची धमकी दिली.

याबाबत सह धर्मादाय आयुक्त पुणे जिल्हा यांना पत्र दिले असता, सह धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी रेखाला फोन करून संजय यांच्या वडिलांचे दारिद्र्य रेषेखालील शासकीय नियमानुसार बिल करून त्यांना सोडण्यास सांगितले. तरी देखील रेखा आणि राजेश यांनी संजय यांच्या वडिलांना सोडले नाही. तसेच रुग्णालयातील बाऊंसर यांनी नातेवाईकांना संजय यांच्या वडिलांना भेटण्यापासून मज्जाव केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. आर. स्वामी तपास करीत आहेत.

याबाबत रेखा दुबे म्हणाल्या, “8 ऑगस्ट रोजी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण पैसे भरण्याचे मान्य केले. परंतु अचानक त्यांनी आयपीएफ योजनेमध्ये उपचार करून बिलाचे पैसे कमी करण्याचे सांगितले. आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले की, यासाठी प्रोसेस असते. प्रत्येक रुग्णाला या योजनेत सहभागी करता येत नाही. त्यानंतरही नातेवाईकांनी रुग्णाला पाच दिवस रुग्णालयात ठेवून सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क केला. रुग्णालय प्रशासनाने सामाजिक कार्यकर्त्यांना या योजनेची माहिती आणि सदर रुग्ण त्याचा फायदा घेऊ शकत नसल्याचे सांगितले”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.