Wakad: शाळेत नियमबाह्य पद्धतीने पुस्तक विक्री, पालिकेने ठोकले सील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड येथील नियमबाह्यपद्धतीने, चढ्या विक्रीने, पालकांना जबरदस्तीने शालेय साहित्याची विक्री करणा-या ‘द गुड सॅमअ‍ॅरीटन’ या खासगी शाळेवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वह्या, पुस्तके ठेवलेल्या दोन खोल्यांना ‘सील’ ठोकले आहे. तसेच शाळेला नोटीस देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या 2004 च्या निर्णयानुसार शाळेत शालेय साहित्याची विक्री करण्यास मनाई केली होती. पण, 2016 मध्ये उच्च न्यायालयाने शालेय वस्तुंची विक्री करु शकता. पण, किमती अवाजवी नसावी. साहित्य खरेदीसाठी पालकांना जबरदस्ती करु नये असा निर्णय दिला आहे. वाकड येथील शाळेत पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार कारवाई केल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने सांगितले आहे.

शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक विलास पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, वाकड परिसरात असणाऱ्या द गुड सॅमअ‍ॅरीटन या शाळेत नियमबाह्य पद्धतीने तसेच चढ्या दराने वह्या पुस्तकांची विक्री होत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते श्रिजित रमेशन यांनी शिक्षण विभागाला दिली होती. त्यानुसार पाहणी केली असता शाळेच्या दोन खोल्यांमध्ये  लाखो रुपयांची वह्या पुस्तके विक्री होत असल्याचे  निदर्शनास आले. पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात होती. साहित्याची अवाजवी किंमत होती. शाळा प्रशासनाला विचारपूस केली असता संबंधित शाळेच्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित माहिती दिली नाही. पुस्तक ठेवलेल्या दोन खोल्यांना सील ठोकण्यात आले आहे.

पालिकेच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाल्या, शाळेत चढ्यादराने पुस्तक विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पाहणी केली असता विक्री होत असल्याचे समोर आले आहे. शाळेच्या दोन खोल्यांना सील ठोकले आहे. नोटीस देण्यात येणार आहे. नोटीसचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.