Wakad : एटीएममधील चीटिंगला प्रतिसाद मिळत नसल्याने ‘त्यांनी’ सुरू केली एटीएम कटिंग!; हरियाणातील टोळीचा वाकड पोलिसांकडून पर्दाफाश

एमपीसी न्यूज – एटीएमच्या आसपास थांबून पैसे काढण्यासाठी येणा-या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा करून फसवणूक करायची. त्याचबरोबर कार्ड क्लोनिंग करून नागरिकांच्या खात्यामधून पैसे काढून घ्यायचे. कालांतराने नागरिक सावध झाले. नागरिक या टोळीच्या जाळ्यात अडकेनासे झाले. त्यामुळे या बहाद्दरांनी एटीएम मशीनच कापून पैसे चोरण्याचा नवा फंडा सुरु केला. या टोळीचा पर्दाफाश करून वाकड पोलिसांनी थेरगावमधील तिघांना आणि हरियाणा मधील तिघांना अटक केली आहे.

झरुद्दीन ताहीर हुसेन (वय 29) सरफुद्दीन हसीम (वय 22), मोहमद शकिर हसन (वय 35) अशी हरियाणा मधून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संदीप माणिक साळवे (वय 43), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (वय 42), गौतम किसन जाधव (वय 38) या तिघांना थेरगाव येथून अटक केली आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. 27 जानेवारी रोजी थेरगाव येथे अ‍ॅक्सीस बँकेचे तर 12 फेब्रुवारी रोजी रहाटणी येथे आरबीएल बँकेचे एटीएम अनोळखी चोरट्यांनी फोडले. 15 दिवसात एकाच परिसरात दोन एटीएम फोडल्याने वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेतली. या तपासासाठी वाकड पोलिसांनी चार पथके तयार केली. एटीएम सेंटरच्या परिसरातील लॉज, शहरात येणारे-जाणारे मार्ग, टोल नाके येथील सीसीटीव्ही पिंजून काढले. तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना माहिती मिळाली की, काहीजण कारमधून तोंडाला बांधून येऊन एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून रोकड चोरत आहेत.

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली की, वाकड येथे दाखल असलेल्या एटीएम फोडीच्या गुन्ह्यातील दोघेजण थेरगाव फाटा येथे येणार आहेत. परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे हरियाणा राज्यातील असल्याचेही ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी दिल्ली मार्गे हरियाणा येथे जाऊन अटक केली. त्यातील एकाला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर तर अन्य दोघांना त्यांच्या गावापासून काही अंतरावर बोलावून सापळा रचून अटक केली.

अझरुद्दीन, सर्फुद्दीन, संदीप आणि दत्तात्रय या चौघांनी गणेशनगर थेरगाव येथे अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडले होते. तर मोहमद आणि गौतम यांनी रहाटणी येथील आरबीएल बँकेचे एटीएम फोडले होते. सर्व आरोपींकडून तीन लाख रुपये रोख रक्कम, तीन कार, एक दुचाकी, गॅस सिलेंडर, गॅसगन कटर, एटीएम मधील रिकामे कॅसेटस, 16 एटीएम डेबिट कार्ड असा 20 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या आरोपींचे आणखी सहा साथीदार सध्या फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

हरियाणा येथील आरोपी स्थानिक आरोपींना हाताशी धरून त्यांच्याकडून परिसरातील एटीएम सेंटरची माहिती घेत. एटीएम मशीन कट करण्यासाठी लागणारे गॅस कटर, ऑक्सिजन गॅस, एलपीजी गॅसची पूर्तता स्थानिक आरोपी करीत असत. त्या बदल्यात त्यांना हजारो रुपयांची चांगली रक्कम देखील मिळत असे. एटीएम फोडून चोरी केल्यानंतर सर्व आरोपी आपापला हिस्सा घेऊन आपापल्या मार्गाने जात असत. काही आरोपी कार तर काहीजण विमानाने जात असत.

अटक केलेल्या सहा जणांनी पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी एटीएम फोडले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन, सांगवी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी, दिघी आणि चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सर्फुद्दीन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सेक्टर पाच, गुरगाव पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा तर सोहना गुरगाव, सेक्टर 56 गुरुग्राम पोलीस ठाण्यात सात फसवणुकीचे व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

एटीएमच्या सुरक्षेबाबत बँकांना विचारले असता, आम्ही आमच्या मुख्य कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. असे ठराविक उत्तर बँकांकडून दिले जात असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. त्यामुळे ‘ज्या बँका त्यांच्या एटीएमच्या बाबतीत सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नाहीत, त्या बँकांमध्ये नागरिकांनी आपले पैसे ठेऊ नयेत, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाकडच्या टीमने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक महिन्यात राज्यातील बेस्ट डिटेक्शनचा सन्मान केला जातो. त्या सन्मानासाठी वाकड पोलिसांनी केलेली कामगिरी सादर केली जाणार आहे. पोलीस आयुक्तांनी या पथकाला 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, बिभीषण कन्हेरकर, जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, सुरेश भोसले, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक भोसले, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.