Wakad : कस्टममध्ये जप्त झालेली कार कमी पैशात खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कस्टममध्ये जप्त झालेली कार लिलावामध्ये कमी किमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी मिळून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना के ट्रान्स ऑफिस वाकड येथे 13 मार्च 2018 रोजी घडली.

विजय नागनाथ काटे (रा. दत्त मंदिर रस्ता वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश यादव (रा. कुर्ला गार्डन जवळ, मुंबई. मूळ रा. जाधववाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), दशरथ कोकरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याने जेएनपीटी मुंबई येथे कस्टम अधिकारी असल्याचे सांगून जेएनपीटी मुंबई येथे कस्टममध्ये जप्त झालेली कार खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. त्यात आरोपी दशरथ याने एजंट असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींनी संगनमत करून 13 मार्च 2018 रोजी फिर्यादी विजय यांच्याकडून पाच लाख रुपये बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. विजय यांनी सर्व पैसे दिले. मात्र आरोपींनी विजय यांना कार दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वाकड पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.