Wakad : बांधकामाचे पैसे मागणा-या कॉन्ट्रॅक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज – बांधकामाचे काम केलेल्या आरसीसी कॉन्ट्रॅक्टरला आठ जणांनी मिळून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी अकराच्या सुमारास काळेवाडी येथील दर्वेश कन्स्ट्रक्शन येथे घडली.

चंदू इस्त्राफिल मंडल (वय 39, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार माणिक बाळकृष्ण वाघिरे (वय 46), शरद प्रकाश कोतकर (वय 24), पवन संजय हिरवे (वय 25, सर्व रा. पिंपरीगाव) आणि त्यांचे इतर चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचे काळेवाडी येथे बांधकाम सुरु आहे. त्या साईटवर फिर्यादी चंदू यांनी आरसीसीचे काम केले. त्या कामाची रक्कम 1 कोटी 60 लाख रुपये होती. ती रक्कम मागण्यासाठी चंदू आरोपींकडे मागितले असता आरोपींनी चंदू यांना फोनवरून शिवीगाळ केली. तसेच बांधकामावर येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी माणिक वाघिरे याने ‘माझ्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही’ अशी चंदू यांना धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.