Wakad : पोलीस वसाहतीमधील एकाला कोरोनाची लागण; पोलीस वसाहतीमधील एक इमारत सील

एमपीसी न्यूज – पुण्यातील दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी एकजण वाकडमधील कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून वसाहतीमधील एक इमारत सील करण्यात आली आहे.

पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या एका पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे दोन दिवसांपूर्वी निष्पन्न झाले. त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी एक कर्मचारी वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये राहण्यास आहे. याबाबत पुण्यातील ‘त्या’ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दुजोरा दिला आहे.

वाकडमधील स्थानिक नगरसेवकाने याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेस कळविले. त्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून कावेरीनगर पोलीस वसाहतमधील एक इमारत सील करण्यात आली आहे. तिन्ही पोलिसांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 800च्यावर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 53 झाला आहे. यातील दिलासादायक वृत्त म्हणजे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी (21 एप्रिल) 19 जण कारोनामुक्त झाले. यामध्ये 3 वर्षांच्या मुलीसह 92 वर्षांच्या वृद्धाचा देखील समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.