Wakad : खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दाम्पत्याला मारहाण; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – आठ जणांनी मिळून पती-पत्नीला मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. दाम्पत्याला खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 14) रात्री सव्वासातच्या सुमारास वाकड गावठाण येथे घडला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण भीमराव वाघमारे, पूजा किरण वाघमारे, सिकंदर वाघमारे, कुंदन वाघमारे, सिंधूबाई वाघमारे, सविता सुनील गायकवाड, सिद्धार्थ सुनील वाघमारे, गजराबाई देवडे (सर्व रा. अशोकनगर, वाकड गावठाण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वासातच्या सुमारास सर्व आरोपींनी बेकायदेशीरपणे फिर्यादी महिलेच्या घरासमोर जमाव जमवला. फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. फिर्यादी महिलेचा पुतण्या हे भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण केली. आरोपी किरण वाघमारे याने फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला, तर त्याची पत्नी पूजा हिने फिर्यादीच्या पतीला ‘आधीच तुझ्यावर एक खोटी केस केली आहे. अजून केस करून तुमच्या घरादाराला कशी अडकवते ते बघ’ असे म्हणून धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.