Wakad : महाकाली गँगच्या म्होरक्या डिंगऱ्याच्या खून प्रकरणी एकाला गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ आणि महाकाली गँगचा म्होरक्या डिंगऱ्या याचा खून झाला. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली घडली. या प्रकरणातील आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने 12 तासाच्या आत अटक केली आहे.

आदम उर्फ गोट्या मोहम्मद खान (वय 32, रा. पुनावळे. मूळ रा. सोमटणे फाटा, सोमटणे) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया (वय 30, रा.  देहूरोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पूनम मनोज ढकोलिया यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंगऱ्या आणि आदम हे दोघे रविवारी रात्री दारू पिण्यासाठी लंडन ब्रिजखाली बसले होते. दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला.

त्यातून आदम याने डिंगऱ्याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारले आणि आदम पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चार करत होते.

त्यानंतर  पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली की, पुनावळे स्मशानभूमी येथे एका झाडाखाली एक संशयित व्यक्ती झोपला आहे. त्याने हा खुनाचा प्रकार केला असल्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात जाऊन पोलिसांनी आदम याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, रविवारी रात्री आठ वाजता दोघेजण लंडन ब्रिजखाली दारू प्यायले. दरम्यान त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर डिंगऱ्या तिथेच झोपी गेला. डिंगऱ्या झोपेत असताना आदम याने त्याच्या डोक्यात लाकडी बांबूने मारून त्याचा खून केला.

महाकाली गँगचा तत्कालीन प्रमुख राकेश फुलचंद ढकोलिया याचा 2011 साली एन्काऊंटर झाला. डिंगऱ्या हा राकेशचा लहान भाऊ होता. डिंगऱ्या हा देखील सराईत गुंड असून त्याने महाकालीच्या एन्काऊंटरनंतर गँग चालविण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.

डिंगऱ्या याच्यावर 11 गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला नोव्हेंबर 2019 मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात आला होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, प्रवीण दळे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, मोहम्मद गौस नदाफ, लक्ष्मण आढारी, तुषार शेटे, संतोष असवले, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.