Wakad : गुन्हे शाखेकडून 20 हजाराची विविध कंपन्यांची दारू जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास पकडले. त्याच्याकडू 20 हजार 220 रुपयांची विविध कंपन्यांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) याबाबत मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बादल भुपती बेरा (वय 33, रा. शेडगे वस्ती, औंध हिंजवडी रोड, वाकड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना, दारुची दुकाने बंद ठेवण्याचे व दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा अलर्ट झाल्या आहेत.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती वाकड येथून पिंपळे निलखच्या दिशेने एका मोपेड दुचाकीवरून अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे. यावरून पोलिसांनी मानकर चौकात सापळा रचून बेरा याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीवर तीन बॉक्स दारूचे आढळून आले.

त्यात बडवायझर मग्नम बिअरच्या 24 बाटल्या, मजिक मोमेंट प्रिमियम वोडक्याच्या 44 बाटल्या, 4 स्मर्नाफ वोडका अशा एकूण 20 हजार 220 रुपयांच्या दारूच्या बाटल्या होती.

पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि 20 हजारांची दुचाकी (एमएच 14 / डीडी 7873) जप्त केली. आरोपीवर साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3 व 4, भारतीय दंड विधान कलम 269, 188, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.