Wakad Crime : चिकन सप्लायरला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चार जणांनी मिळून एका चिकन सप्लायरला बेदम मारहाण केली. तसेच ठार मारून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकून कुठेतरी टाकून देण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता वाकड रोडवरील आमीर चिकन सेंटरवर घडला.

मळू बाळू गेरंगे (वय 39, रा. शिव कॉलनी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय मोरे, संदीप मोरे, प्रदीप मोरे, संदीप देवकर (सर्व रा. हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गेरंगे हे चिकन सप्लाय करण्याचे काम करतात. रविवारी पहाटे तीन वाजता ते वाकड रोडवरील आमीर चिकन सेंटरवर चिकन सप्लाय करत असताना आरोपी इनोव्हा, डस्टर कार आणि अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन तिथे आले. आमीर चिकन कंपनीचे मालक असलेल्या आरोपींनी फिर्यादी यांना ‘तू आमच्या कंपनीच्या दुकानांना माल का सप्लाय करतो, तुझ्याकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली.

लोखंडी रॉडने मारून फिर्यादी यांना जखमी केले. आमीर चिकन सेंटरचे दुकान मालक भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. ‘तुला ठार मारून अ‍ॅम्ब्युलन्स मध्ये टाकून कुठेतरी टाकून देऊ’ अशी आरोपींनी फिर्यादी यांना धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.