Wakad Crime : आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून चौघांची 17 लाख 75 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे अमिष दाखवले. काही कालावधीपर्यंत ठराविक रकमेचे व्याज देऊन आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडून चार जणांनी एकूण 17 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हा प्रकार 4 जून 2013 पासून 27 फेब्रुवारी 2021 या कालावधीत द वूड्स वाकड, काळेवाडी येथे घडला आहे.

सुवर्ण सिद्धी इंकेस्टमेंट द वूड्स वाकड काळेवाडी सर्कल जवळ कार्यालय क्रमांक सात पुणे, वृषाली प्रवीण कानडे (रा. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे), नोबल पॉलरिचार्ड द वूड्स वाकड काळेवाडी सर्कल जवळ कार्यालय क्रमांक सात पुणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात लहू मनोहर भुजबळ (वय 54, रा. वाकड गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. लहू भुजबळ आणि त्यांच्या पत्नी ज्योती लहू भुजबळ (वय 54, रा. वाकड गावठाण) यांना आर्थिक गुंतवणुकीचे अमिष दाखवून आरोपींनी चांगला मोबदला मिळेल असे सांगितले. 18 जुलै 2013 पासून 19 जानेवारी 2017 या कालावधीत गुंतवलेल्या काही रकमेचे व्याज देऊन आरोपींनी आणखी आर्थिक गुंतवणूक करण्यास दोघांना भाग पाडले. गुंतवणुकीवर तीन टक्के व्याज देण्याचे अमिश दाखवून फिर्यादी लहू भुजबळ यांच्या चार लाख 75 हजार आणि त्यांची पत्नी ज्योती भुजबळ यांच्या एक लाख 50 हजार असा एकूण 6 लाख 25 हजार रुपयांचा अपहार केला. त्यांना त्यांची मुद्दल आणि व्याज परत न करता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या प्रकरणात भालचंद्र भिकाजी खोले (वय 68, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. भालचंद्र खोले आणि त्यांच्या पत्नीला देखील आरोपींनी अशाच प्रकारचे अमिष दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. भालचंद्र यांनी 10 लाख 50 हजार तर त्यांच्या पत्नीने एक लाख रुपये गुंतवणूक केली. त्या रकमेचा आरोपींनी अपहार केला. दोन्ही प्रकरणात आरोपींनी एकूण 17 लाख 75 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.