Wakad Crime : काळेवाडी डबल मर्डर प्रकरण; महिनाभरानंतरही पोलिसांना आरोपींचा माग लागेना

एमपीसी न्यूज – घरात झोपलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून तिचा खून केला. तर शेजारीच झोपलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्याही महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार 16 ऑक्टोबर रोजी पहाटे काळेवाडी येथे घडला. या घटनेला एक महिना उलटला असून अजूनही पोलिसांना आरोपीचा माग लागलेला नाही.

छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50), मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) यांचा खून झाला होता. 15 ऑक्टोबर रोजी रात्री मयत छाया, विहिण मंगल, पती पांडुरंग आणि सासू सुंदराबाई भानुदास गुंजाळ हे चारजण घराच्या हॉलमध्ये झोपले होते. सासू सुंदराबाई या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे 16 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास सुंदराबाई घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी निघून गेल्या.

अर्धवट उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात हल्लेखोराने छाया यांना कठीण वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केला. तर छाया यांच्या शेजारी झोपलेल्या मंगल यांना देखील ठार मारण्याच्या उद्देशाने मारून गंभीररीत्या जखमी केले. 10 दिवसानंतर मंगल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या दिशा ठरवून तपासही सुरु केला. मात्र घटनेला एक महिना उलटून गेला आहे. अद्यापही पोलिसांच्या हाती हल्लेखोरांचे कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत.

सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार म्हणाले, “या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात अजून पर्यंत काहीही निष्पन्न झालेले नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.