Wakad Crime : घरात झोपलेल्या महिलेचा खून प्रकरण; चार दिवसानंतरही पोलिसांना आरोपीचा पत्ता लागेना

एमपीसी न्यूज – झोपेत असलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. 16) पहाटे काळेवाडी येथे घडली. तसेच या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

घरात घुसून खून केल्याने हा प्रकार गंभीर आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घटनास्थळी भेट दिली होती. मात्र, चार दिवसानंतरही या प्रकरणात पोलिसांना आरोपींचा पत्ता लागलेला नाही.

छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष पांडुरंग गुंजाळ (वय 32, रा. तुळजाभवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी रात्री संतोष यांची आई मयत छाया, सासू जखमी मंगल, वडील पांडुरंग आणि आजी सुंदराबाई भानुदास गुंजाळ हे चारजण घराच्या हॉलमध्ये झोपले होते. आजी सुंदराबाई या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सुंदराबाई घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी निघून गेल्या.

_MPC_DIR_MPU_II

अर्धवट उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने छाया यांना कठीण वस्तूने मारहाण करून त्यांचा खून केला. तर छाया यांच्या शेजारी झोपलेल्या संतोष यांच्या सासू मंगल यांना देखील ठार मारण्याच्या उद्देशाने मारून गंभीररीत्या जखमी केले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आयुक्तांनी तपासाचे निर्देश दिले. मात्र, चार दिवस उलटून गेल्यानंतर देखील या प्रकरणाचे पोलिसांना धागेदोरे लागलेले नाहीत.

थेरगाव परिसरात डिसेंबर 2018 मध्ये चार ते पाच वर्ष वयाच्या मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाची अद्यापही ओळख देखील पटलेली नाही. चिमुकल्याचा खून करून मृतदेह पुरून टाकला होता. त्यानंतर श्वानांनी तो मृतदेह उकरून बाहेर काढल्याने प्रकार उघडकीस आला होता. त्याबाबत देखील वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.