Wakad crime News : भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांचे टोळके एकास मारहाण करीत होते. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार केले. तसेच डोक्‍यात कुंडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री नढेनगर, काळेवाडी परिसरात घडली.

सागर शिंदे, असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. संजय पांडूरंग घोडके (वय 49, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोन्या सावंत, विनायक श्रीवास्तव, दीपक सगर, सुनील शिंदे, ओंकार पांचाळ, अनिकेत हातमकर, हैदर शेख आणि इतर तीन ते चार जण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय घोडके आणि आरोपी यांचे 24 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास काळेवाडीतील पाटील हॉस्पिटलजवळ फिर्यादी संजय घोडके यांना गाठले. घोडके आणि तिथे असलेल्या काही नागरिकांना आरोपींनी शिवीगाळ आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

त्यावेळी तिथे असलेले सागर शिंदे यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिडलेल्या आरोपींनी शिंदे यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच आरोपी विनायक श्रीवास्तव याने डोक्‍यात कुंडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतर आरोपींनीही सागर शिंदे यांना मारहाण केली. तसेच आरोपींनी हातातील हत्यारे नाचवत परिसरातील वाहने पाडून दहशत निर्माण केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.