Wakad Crime News : वाहतूक पोलिसाच्या हातातून पावती पुस्तक पाळवण्याचा प्रयत्न; वाहतूक पोलिसाला मारहाण, एकास अटक

एमपीसी न्यूज – विनामास्क कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चारचाकी चालकाने मारहाण केली. तसेच वाहतूक पोलिसाच्या हातातून पावती पुस्तक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. 9) सकाळी घडली.

मनविंदर सिंग भाटीया (वय 48, रा. मिरचंदनानी पाल्मस सोसायटी, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई सतीश जनार्दन देवकर यांनी रविवारी (दि. 9) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात वाहतूक पोलीस देवकर हे विकमास्क वाहन चालकांवर कारवाई करीत होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास भाटीया हा (एमएच 14 / एफजी 1165) या चारचाकी वाहनातून विनामास्क आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता त्याने वाहन न थांबविता पुढे निघून गेला.

त्यानंतर सिग्नलला इतर वाहनांना अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यात वाहन उभे करून खाली उतरून फिर्यादी यांच्याकडे आला. त्याने फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांच्या हातात असलेले विनामास्कचा दंड करणारे पावती पुस्तक हातातून ओढून तसेच त्याचा वाहन परवाना पोलिसांच्या हातातून जबरस्तीने हिसकावून घेतला. तसेच पोलीस कर्मचारी देवकर करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला. आरोपीकडून पावती पुस्तक घेत असताना त्याने पोलिसाच्या हातावर मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.