Wakad Crime News : काळेवाडी दुहेरी खून प्रकरणात मुलगा सुनेसह चौघांचे होणार ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ आणि नार्को

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथे घरात झोपलेल्या दोन महिलांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला. ही घटना 15 ऑक्टोबर 2020 रोजी घडली.

घटनेला चार महिने उलटून गेले. मात्र पोलिसांच्या हाती अजूनही ठोस काहीच लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी खून झालेल्या महिलेचा मुलगा, सून आणि अन्य दोघांचे ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची विशेष परवानगी देखील पोलिसांनी घेतली आहे.

छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50), मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत.

15 ऑक्टोबर रोजी रात्री मयत छाया, त्यांच्या सुनेची आई मयत मंगल, छाया यांचे पती आणि सासू असे चौघेजण घरातील हॉलमध्ये झोपले होते. आतल्या खोलीत छाया यांचा मुलगा आणि सून झोपले होते. छाया यांची सासू भाजी विक्रीचा व्यवसाय करते. त्यामुळे पहाटे चार वाजताच्या सुमारास छाया यांची सासू भाजी खरेदीसाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. त्यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता.

दरम्यान, घरातील व परिसरातील लाईट गेले. अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात हल्लेखोरांनी उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून छाया आणि त्यांच्या सुनेची आई मंगल यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात छाया यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंगल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. प्राथमिक चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने परिसराती सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु झाली. त्यात दिसणाऱ्या प्रत्येक संशयितांची तपासणी केली. तरीही पोलिसांना धागेदोरे सापडेनात. दरम्यान पोलिसांनी एक हजार 600 जणांचे कॉल डिटेल्स तपासले. त्यातही काही मिळाले नाही.

त्यामुळे पोलिसांनी आता वैद्यकीय चाचण्या करण्याचा पर्याय निवडला आहे. मयत छाया यांचा मुलगा, त्यांची सून आणि अन्य दोघांचे ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. यातून पोलिसांच्या हाती काहीतरी लागेल अशी आशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी डॉ. विवेक मुगळीकर यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेन मॅपिंग टेस्ट –
‘ब्रेन मॅपिंग टेस्ट’ या वैद्यकीय परीक्षण पद्धतीचा शोध अमेरिकन न्यूरॉलॉजिस्ट डॉ. लॉरेन्स ए फारवेल यांनी लावला. या टेस्टमध्ये संशयित व्यक्तीच्या डोक्यावर संगणकाशी जोडलेले एक हेल्मेट घातले जाते. या हेल्मेटमध्ये अनेक इलेक्ट्रिक उपकरणे आणि सेन्सर लावले जातात. त्यानंतर संशयित व्यक्तीला घटनेशी संबंधित फोटो दाखवले जातात अथवा आवाज ऐकवला जातो. त्यानंतर संशयित व्यक्तीच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या लाटा (वेव्ज) तपासल्या जातात. संबंधित व्यक्तीचा घटनेची संबंध नसेल तर तो त्याला दाखवलेले फोटो, ऐकवले आवाज ओळखणार नाही. त्यावेळी त्याच्या मेंदूतून सामान्य वेव्ज बाहेर पडतात. मात्र जर संबंधित व्यक्तीचा दाखवलेले फोटो आणि ऐकवलेल्या आवाजाशी संबंध असेल तर त्याच्या मेंदूतून विशिष्ट प्रकारच्या वेव्ज निर्माण होतात. त्या वेव्ज संगणकाद्वारे ओळखून संशयाचे प्रमाण सिद्ध केले जाते. मेंदूत निर्माण होणाऱ्या नैसर्गिकरित्या हालचालींच्या आधारे ही चाचणी केली जाते.

पॉलिग्राफ टेस्ट –
रक्तदाब, नाडी, श्वासोच्छवास, त्वचा यांच्यातील होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करत संशयित व्यक्तीच्या बोलण्यातील तथ्य तपासले जाते. काही मशीन शरीरावर लावून संशयित व्यक्तीला प्रश्न विचारले जातात. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना व्यक्तीच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण नोंदवले जाते. रक्तदाब, नाडी, श्वासोच्छवास, त्वचा यावर लक्ष ठेऊन अनेक ग्राफ बनवले जातात. यातून निष्कर्ष काढले जातात.

नार्को टेस्ट –
नार्को टेस्ट देखील संशयित व्यक्तीच्या बोलण्यातील तथ्य आणि घटनेशी निगडित खऱ्या बाबी बाहेर काढण्यासाठी केली जाते. संशयित व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याला सोडियम पेंटॉथॉल नावाचे इंजेक्शन दिले जाते. याद्वारे संशयित व्यक्ती शुद्धीतही नसतो आणि बेशुद्धही नसतो. या अवस्थेत कितीही ठरवले तरी संशयित व्यक्ती खरे बोलून टाकतो. ही टेस्ट करताना तपास अधिकारी, डॉक्टर, फॉरेन्सिक एक्स्पर्ट, मनोवैज्ञानिक उपस्थित असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.