Wakad Crime News : खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जाणीवपूर्वक महिलेने तरुणाला हटकले. त्यानंतर तिच्या दोन साथीदारांनी येऊन महिलेची छेड काढल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तरुणाकडे दहा हजारांची खंडणी मागितली. तसेच तरुणाकडून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत तरुणाने न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित संजय पाबळकर (वय 23, रा. डांगेचौक, थेरगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश रामदास रावठकर (वय 24, रा. पाषाण पुणे), महिला आरोपी (रा. डांगे चौक, थेरगाव) आणि एक अज्ञात इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 6 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी सात वाजता डांगे चौक थेरगाव येथे घडला. आरोपी महिलेने फिर्यादी रोहित यांना हटकले. त्यावेळी रोहित यांनी महिलेला बाजूला होण्यास सांगितले. त्यावेळी अन्य दोन आरोपी तिथे आले. आरोपी गणेश लोखंडी रॉड घेऊन आला होता.

महिलेला छेडछाड केली म्हणून पोलिसात खोटा गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची धमकी आरोपींनी रोहित यांना दिली. तसेच रोहित यांच्याकडे दहा हजारांची मागणी केली. त्यांच्याकडून दोन हजार रुपये आरोपींनी हिसकावून घेतले. उर्वरित पैसे घेण्यासाठी आरोपींनी रोहित यांना लोखंडी रॉड, फरशी आणि लाथाबुक्क्यांनी तोंडावर, नाकावर, हातापायावर मारहाण करून जखमी केले.

याबाबत रोहित यांनी न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने 6 एप्रिल रोजी दिले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.