wakad Crime News : छाया गुंजाळ खून प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – झोपेत असलेल्या महिलेच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. 16) पहाटे काळेवाडी येथे उघडकीस आली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले आहेत.

संतोष पांडुरंग गुंजाळ (वय 32, रा. तुळजाभवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. छाया पांडुरंग गुंजाळ (वय 50) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मंगल साहेबराव सत्वधर (वय 48) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री फिर्यादी यांची आई मयत छाया, सासू जखमी मंगल, वडील पांडुरंग आणि आजी सुंदराबाई भानुदास गुंजाळ हे चारजण घराच्या हॉलमध्ये झोपले होते. आजी सुंदराबाई या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सुंदराबाई घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेऊन नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी निघून गेल्या.

_MPC_DIR_MPU_II

अर्धवट उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने छाया यांना मारहाण करून त्यांचा खून केला. तर छाया यांच्या शेजारी झोपलेल्या फिर्यादी यांच्या सासू मंगल यांना देखील ठार मारण्याच्या उद्देशाने मारून गंभीररीत्या जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.