Wakad Crime News : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे ऑनलाईन माध्यमातून विक्री केल्याप्रकरणी गुजरात येथील एका कंपनी चालकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 5) फिर्याद दिली आहे. त्यानुसार RK Medicenes, A/61, parisima complete, c g road, navrangpura, ahmedabad, gujrat, 380006 याचे चालक पिंटू कुमार प्रवीणचंद्र शहा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जात नाहीत. तरीदेखील बेकायदेशीरपणे आरोपीने ही औषधे ऑनलाइन माध्यमातून विकली. विवेक मल्हारी तापकीर यांनी ॲमेझॉन या ऑनलाइन पोर्टलद्वारे गर्भपाताची औषधे 31 मे रोजी मागवली. त्यांना आरोपीच्या कंपनीची औषधे 4 जून रोजी मिळाली.

त्यानंतर तापकीर यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुण्याचे सहआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याबाबत फिर्यादी अन्न निरीक्षक आणि अन्न निरीक्षक विवेक खेडकर यांनी गुजरात येथे जाऊन या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपी दोषी आढळला. त्यानुसार याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 120 (ब) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत 18 (a) (vi), 18 (c) read with rule 65 (3) (1), 65 (4) (4), 65 (6), 65 (9) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.