Wakad : पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना शिवीगाळ करीत धमकी

एमपीसी न्यूज – चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाने पोलीस चौकीतच पोलिसांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना काळेवाडी पोलीस चौकीत मंगळवारी (दि. 25) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.

इम्तियाज बरकतअली आत्तार (वय 34, रा. परमवीर कॉलनी, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक महेश विनायकराव बारकुले (वय 35) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिर्यादी पोलीस नाईक बारकुले काळेवाडी पोलीस चौकीत ड्युटी अंमलदार मदतनीस म्हणून कार्यरत होते. त्यावेळी कोहिनुर हॉटेलचे व्यवस्थापक पवनसिंग सताराम यादव यांनी ते काम करत असलेल्या हॉटेलचा भागीदार मालक सुरज देविदास कांबळे याच्या विरोधात तक्रार दिली.

त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉटेलचा दुसरा भागीदार आरोपी इम्तियाज याला पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा केला. पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत सर्व पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली. यावरून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मुदळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.