Wakad Crime News : ‘या’ कारणासाठी केले व्यवसायिकाचे अपहरण

एमपीसी न्यूज – गर्भपाताच्या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तसेच पोलीस असल्याचे सांगत सहा जणांनी मिळून एका मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. तसेच मेडिकल व्यवसायिकाकडे सहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाला ते मेडिकल दुकान चालवायला घ्यायचे असल्याने आधीच्या व्यावसायिकाला बेदखल करण्यासाठी त्याने इतर साथीदारांसोबत मिळून हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

टायगर ग्रुपचा अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड (वय 32), राहुल छगन लोंढे (वय 24), प्रकाश मधुकर सजगणे (वय 31, तिघे रा. अष्टविनायक कॉलनी, वाकड), प्रीतेश बबनराव लांडगे (वय 30, रा. प्रभात कॉलनी, वाकड), कमलेश राजकुमार बाफना (वय 32, रा. वाकड), संतोष बापू ओव्हाळ (वय 28, रा. वाकड) आकाश विजय हारकरे (वय 27, रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अशोक बेलिराम आगरवाल (वय 53, रा. विकास नगर, किवळे) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे डांगे चौकात स्पंदन मेडिकल आहे. मेडिकल व्यवसायात खूप फायदा असल्याने कमलेश बाफना याला फिर्यादी चालवत असलेले मेडिकल चालविण्यासाठी घ्यायचे होते. फिर्यादी यांना त्या मेडिकल मधून बेदखल करून बाफना याचा ते चालवायला घेण्याचा डाव होता.

यासाठी त्याने अन्य आरोपींसोबत मिळून फिर्यादी यांचे अपहरण करून त्यांच्याकडे सहा लाखांची खंडणी मागितली. तसेच मेडिकल दुकानात असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.