Wakad Crime News : छळ करुन विवाहितेला घराबाहेर काढले; सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला घरातून हाकलून दिले. याबाबत पती, सासू आणि दोन नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 डिसेंबर 2019 पासून 12 फेब्रुवारी 2021 या कालावधीत रहाटणी येथे घडला.

पती निखिल महादेव शिंदे (वय 28, रा. रहाटणी), 55 वर्षीय सासू आणि 30 वर्षीय व 32 वर्षीय नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल याला दारूचे व्यसन आहे. त्याने विवाहितेचे दागिने गहाण ठेवले. तिच्या नावावर दीड लाख रुपयांचे पर्सनल लोन काढण्यास सांगून ते पैसे स्वतः खर्च केले. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले.

तसेच तिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहिता माहेरी गेल्यास मी फाशी लावून आत्महत्या करीन, अशी धमकी पती निखिल याने दिली. निखिल याने त्याच्या आई आणि दोन बहिणींना विवाहितेच्या वागणुकीबाबत खोटे सांगितले. त्यावरून सासू आणि दोन नणंदांनी देखील विवाहितेला खोटे ठरवून तिला शिवीगाळ करून मारहाण करत घरातून हाकलून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.