Wakad crime News : चोरीच्या गुन्ह्यातील दीड कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला तक्रारदारांना परत

एमपीसी न्यूज – वाकड, हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने व रोख रक्कम तक्रारदारांना परत देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये एकूण 49 गुन्ह्यातील एक कोटी 48 हजार 596 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी तक्रारदारांना परत केला.

वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि .21) हा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते नागरिकांना हा ऐवज परत करण्यात आला. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार उपस्थित होते.

कार्यक्रमात वरिष्ठ निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, बाळकृष्ण सावंत, रंगनाथ उंडे यांच्यासह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले की, लोककल्याणकारी राज्यात आम्हाला जनताभिमुख होणे आवश्‍यक आहे. पीडित मोठा असो की छोटा, श्रीमंत असो की गरीब, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. काहीजण पद, पैसा या जोरावर पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

मात्र, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. पोलिसांकडून मोठी अपेक्षा केली जाते. चांगले काम केले तरी काहीजण त्यांच्याविरोधात आंदोलन करतात. नाही केले तरी त्यांच्यावर टीकाच केली जाते. पोलिसांनी मुद्देमाल केवळ शोधला नाही तर फिर्यादीपर्यंत पोहोचविला हे महत्वाचे आहे. सेवाभावाची प्रक्रिया आगामी काळात सतत सुरू राहिल, असेही त्यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांप्रमाणेच घरीही आमचे चिमुकले वाट पाहत असतात. आमचे कुटुंबीयही घरी काळजी करतात. मात्र, पोलीस कर्तव्याशी एकनिष्ठ राहून कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी झटत असतो.

स्वत:पेक्षाही नागरिकांची काळजी करतात. चांगल्या कामासाठी समाजाचे सहकार्यदेखील अपेक्षित आहे. पोलिसांची मानसिकताही जाणून घ्या, असे भावनिक आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.