_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Wakad Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार; ओनेक्स व क्रिस्टल हॉस्पिटलचे डॉ. सचिन पांचाळ यांना अटक

एमपीसी न्यूज -रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका मेडिकल दुकानदाराचाही समावेश होता. हे मेडिकल ज्या ओनेक्स आणि क्रिस्टल हॉस्पिटलशी संबंधित आहे, त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरचा देखील या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या डॉक्टरला देखील अटक केली आहे.

डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ (बीएएमएस) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. पांचाळ ओनेक्स व क्रिस्टल हॉस्पिटल चालवतात. ते गोदावरी मेडिकलचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत.

यापूर्वी शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय 34, रा. जयमल्हार नगर, दत्तकॉलनी, थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (वय 22, रा. 16 नंबर बस स्टॉप, थेरगाव), निखील केशव नेहरकर (वय 19, रा. बिजलीनगर, चिंचवड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ओनेक्स हॉस्पिटल -चिंचवड (संलग्न आयुश्री मेडीकल) व क्रिस्टल हॉस्पिटल (इन हाऊस गोदावरी मेडीकल) या दोन्ही हॉस्पिटलच्या नावाने दोन्ही मेडीकल स्टोअर्स मार्फत प्राप्त झालेले 21 रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांचा भाऊ शशिकांत पांचाळ याच्या मध्यस्थीने तसेच कृष्णा पाटील व निखील नेहरकर याच्या मार्फत काळया बाजारात विकण्याच्या बेतात असल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. सचिन पांचाळ यांचा य गुन्हयात महत्वाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

यापूर्वी काय घडले ?

_MPC_DIR_MPU_II

आरोपी शशिकांत याचे चिंचवड येथे आयुश्री मेडीकल आहे. आरोपी कृष्णा एका रुग्णालयात नर्सिंग स्टाफ आहे. तर आरोपी निखिल हा डिलिव्हरी बॉय आहे.

शशिकांत याच्या सांगण्यावरून कृष्णा आणि निखिल हे दोघेजण गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीने विकत होते. दोन इंजेक्शनची डिलिव्हरी घेऊन 9 मे रोजी मध्यरात्री पावणेतीन वाजता हे दोघेजण दोन दुचाकीवरून जात होते. काळेवाडी फाटा येथे सुरू असलेल्या सरप्राईज नाकाबंदीमध्ये दोघेजण अडकले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन रेमडेसिवीर इंजेक्शन मिळून आले.

या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्री परवान्याबाबत त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा औषध विक्रीचा परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात ते मेडिकल चालक शशिकांत पांचाळ याच्या सांगण्यावरून ते इंजेक्शन विकण्यासाठी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी देखील दोघांनी अशा प्रकारे इंजेक्शन विकून पांचाळ याला पैसे आणून दिल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी शशिकांत पांचाळ याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची (एम एच 14 / डी ए 4881) झडती घेतली असता सीटच्या खाली 19 रेमडेसिवीर इंजेक्शन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी एकूण 21 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केली.

पोलिसांनी जप्त केलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची अलॉटमेंट गोदावरी मेडीकल स्टोअर्स (इनहाऊस क्रिस्टल हॉस्पिटल ) व आयुश्री मेडीकल स्टोअर्स (संलग्न ओनेक्स हॉस्पिटल) या हॉस्पिटलचे नावाने झाली आहे. या दोन्ही हॉस्पिटलच्या नावाने वितरित करण्यात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन हे आयुश्री मेडीकल स्टोअर्सचे केमिस्ट शशिकांत पांचाळ यांच्या ताब्यात मिळाले आहेत.

आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या डॉक्टर प्रिस्क्रिप्शन आणि बिलाशिवाय इंजेक्शनची विक्री केली. या प्रकरणात आरोपींनी रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने वाटप केलेल्या हॉस्पिटलमध्ये न देता शासनाची तसेच पर्यायाने त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुग्णांची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.