Wakad crime News : वाहने चोरून भंगारात विकणाऱ्या सराईतास अटक; वाहन चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – टेम्पो, ट्रक यांसारखी अवजड वाहने चोरून ती भंगारात विकणाऱ्या एका सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 17 लाख 30 हजारांची पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. वाकड पोलिसांनी वाहन चोरी झालेल्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या.

राजु बाबुराव जावळकर (वय 55, रा. मु पो खानापुर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या सराईत वाहन चोराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे वाहन घेणारा भंगार व्यावसायिक अजिज अब्दुलहक शेख (वय 32, रा. औरंगाबाद रोड, अहमदनगर) यालाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरात सुरू असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना वाकड पोलिसांनी वाहन चोरी झालेल्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्याआधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपी राजू याची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन टेम्पो, एका ट्रकची बॉडी आणि केबिन, वाहन चोरीसाठी वापरलेली बोलेरो आणि स्कॉर्पिओ अशी 17 लाख 30 हजारांची पाच वाहने जप्त केली आहेत.

आरोपी राजू हा सराईत वाहन चोर आहे. तो वाहने चोरून त्याची भंगारात विक्री करत असे. त्याने वाकड मधून चोरलेला ट्रक (एम एच 20 / सी टी 6537) अजिज अब्दुलहक शेख याला भंगारात विकला होता. पोलिसांनी।शेख यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी बॉडी, केबीन बॉडी, ताडपत्री, रस्सी तसेच गॅस कटरचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

राजु जावळकर याचेवर यापूर्वी पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामिण व इतर ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे 1) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे 2) सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस अंमलदार बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, नितीन ढोरजे, बापुसाहेब धुमाळ, अतिश जाधव, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेगंजे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, शाम बाबा, कौंतेय खराडे, सुरज सुतार, सचिन नरुटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.