Wakad crime News : पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाईचे खाते उघडले; वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन मुलींची वाकडमधून सुटका

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसांखाली सामाजिक सुरक्षा पथकाची सुरुवात करण्यात आली आहे. आयुक्तालय सुरू झाल्यानंतर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पथकाची सुरुवात करण्यात आली आहे. पथकाने देखील आपल्या कारवायांचे खाते दोन दिवसातच उघडले आहे. वाकड येथील एका हॉटेलमधून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन तरुणींची सुटका करत मुली पुरविणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांना माहिती मिळाली की, वाकड परिसरात दिनेश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) नावाची व्यक्ती मोबाईल फोनवरून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवत आहे.

त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने दिनेश याच्याशी संपर्क करून वेश्याव्यवसायाकरीता मुलीच्या फोटोची मागणी केली. आरोपी दिनेश याने बोगस कस्टमरच्या व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठविले.

त्यातील दोन मुलींची निवड करून वाकड येथील एका हॉटेलवर पाठवण्यास सांगितले. मुली हॉटेलमध्ये आल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून अनुक्रमे 29 आणि 22 वर्षीय दोन तरुणींची सुटका केली.

दिनेश नावाच्या आरोपीविरुद्द भारतीय दंड विधान कलम 370 (3) सहकलम अनैतीक व्यापार प्रतिबंध अधिनीयम 1956 कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे विशेष अधिकारी पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार सुनिल शिरसाठ, पोलीस नाईक भंगवंता मुठे, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, पोलीस शिपाई राजू कोकाटे, गणेश कारोटे, मारुती करचुंडे, योगेश तिडके यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.