Wakad Crime News : वर्चस्ववादातून झाला ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज – परिसरावर वर्चस्व कोणाचे? या वादातून एका सराईत गुन्हेगाराचा रविवारी (दि. 6) रात्री कट रचून खून करण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे.

पंकज अभिमन्यू धोत्रे (वय 22, रा. नेरे-दत्तवाडी, पुणे) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मुख्य सूत्रधार चेतन दीपक विटकर (वय 26), नीलेश जितेंद्र फडतरे (वय 20), सुमीत विजय हाराळे (वय 19), प्रथमेश बाळू शिंदे (वय 19) आणि मंथन सुधाकर चव्हाण (वय 19, सर्व रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी चेतन वीटकर यांच्यात परिसरातील वर्चस्व कोणाचे यावरून वाद होता. या वादातूनच ते ऐकमेकांना संपविण्याची भाषा करीत होते.

दोनच दिवसांपूर्वी चेतन विटकर आणि पंकज धोत्रे यांच्यात फोनवरून वाद झाला होता. पंकज आपल्याला मारण्या आधीच आपण त्याचा काटा काढू, असे आरोपींनी ठरविले. गेल्या चार दिवसांपासून आरोपी हे मयत पंकज याच्या मागावर होते.

रविवारी रात्री संधी मिळताच आरोपींनी पंकज याच्यावर कोयत्याने वार केले. सुरवातीला पोलिसांना तीनच आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली. तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. आरोपींना विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. त्यानुसार पोलिसांनी आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या.

पंकज याच्यावर कोयत्याने वार केल्यावर तो रक्‍ताच्या थारोळ्यात पडला. तो मेला आहे, असे समजून अल्पवयीन मुलाने मुख्य सूत्रधार चेतन वीटकर याला फोन केला आणि काम फत्ते झाले असे सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त आनंद भोईटे, सहायक आयुक्‍त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, संतोष पाटील, सुनील टोणपे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, अनिल लोहार, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दीपक भोसले, वंदू गिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, सागर कोतवाल यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.