Wakad Crime News : किरकोळ कारणावरून दोन कुटुंबात मारहाण; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री वाकड गावठाण येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

किरण भीमराव वाघमारे (वय 42, रा. वाकड गावठाण) यांनी शनिवारी (दि. 21) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रूपेश रमेश शिंदे, विनोद शिंदे, तेजस वाघमारे आणि एक महिला (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे यांची आई आणि तिची नातेवाइक महिला आरोपी यांच्या किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. फिर्यादी हे महिला आरोपीला समजावून सांगण्यास गेले असता तिने फिर्यादी यांची गचांडी पकडली. त्यानंतर इतर आरोपींनी डोक्‍यात, हातावर आणि कपाळावर दगड आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. फिर्यादी यांचा मुलगा ओंकार याच्याही पायावर दगडाने मारहाण केली. तसेच पत्नी व मुलींनाही शिवीगाळ केली.

तेजस कुंदन वाघमारे (रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याच्या परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण वाघमारे, ओंकार वाघमारे आणि दोन महिला (रा. वाकड गावठाण) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी तेजस याचा चुलता आरोपी किरण आणि इतर आरोपींनी सुरवातीला किरकोळ वाद घातला. त्यानंतर तेजस याच्या डोक्‍यात दगड घालून जखमी केले. तेजस याचा मामा रूपेश शिंदे यांच्या डोक्‍यात दगड मारून कवटी फॅक्‍चर केली. फिर्यादी यांच्या आईला आरोपीच्या घरातील इतर महिला आरोपींनी मारहाण केली. तेजस याचा मित्र अमोल याच्या गाडीवर दगड मारून नुकसान केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.