Wakad : मैत्रिणीशी फ्लर्ट केल्यावरून मित्र-मैत्रिणीमध्ये वाद

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये गेल्यानंतर मैत्रिणीशी फ्लर्ट केल्याचा जाब विचारणार्‍या मैत्रिणीचा तिच्या मित्रानेच हात पिरगाळला. यामध्ये तरुणीच्या हाताला गंभीर इजा झाली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे दोनच्या सुमारास विशालनगर, वाकड येथे घडली.

याप्रकरणी वाकड येथे राहणाऱ्या वंदना (नाव बदलले आहे) 27 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकुलकुमार प्रदीपकुमार तेवतिया (वय 30, रा. विमान नगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वंदना त्यांच्या एका मैत्रिणीच्या आग्रहावरून तिच्या ताथवडे येथील महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी गेली होती. तिथेच वंदना आणि आरोपी मुकुलकुमार यांची ओळख झाली. दोघांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर, दोघेजण वेळोवेळी मित्र मैत्रिणींसोबत पार्टीसाठी जात असत. शनिवारी (दि. 14) रात्री साडेदहाच्या सुमारास ते दोघेजण त्यांच्या चार मित्रांसोबत बाणेर येथील हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले.

पार्टीमध्ये मुकुंदकुमार याने वंदना यांच्या एका मैत्रिणीशी फ्लर्ट केले. त्यानंतर वंदना, मुकुलकुमार आणि त्यांच्या दोन मैत्रिणी मुकुलकुमार याच्या कारमधून रात्री एकच्या सुमारास निघाले. चौघेजण काही वेळ मुंबई-बेंगलोर महामार्गावर फिरले आणि रविवारी पहाटे दीडच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, त्यांनी दोन मैत्रिणींना मेगापोलीस सोसायटी हिंजवडी येथे सोडले.

कारमधून जात असताना वंदना यांनी आरोपी मुकुलकुमार याला हॉटेलमध्ये त्यांच्या मैत्रिणीसोबत फ्लर्ट का करीत होतास, असे विचारले. यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. मुकुलकुमार याने वंदना यांचा उजवा हात पिरगाळला. त्यानंतर, मुकुलकुमार यानेच वंदना यांना प्रथम वाकड आणि नंतर पुण्यातील रुग्णालयात नेले. तिथे उपचार घेतल्यानंतर हाताचे ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. वंदना यांनी वाकड येथील एका रुग्णालयात हाताचे ऑपरेशन केले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर वंदना यांनी मुकुलकुमार याच्या विरोधात गुरुवारी (दि. 19) गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.