Wakad : कार खरेदी करण्याच्या बहाण्याने ग्राहकाकडून साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जुनी कार खरेदी करणार असल्याचे सांगून कार स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर कारचे पैसे न देता, हप्ते न भरता कार मालकाची 3 लाख 58 हजार 275 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रहाटणी येथे घडला.

सदानंद गुरुपद स्वामी (वय 38, रा. अमरदीप कॉलनी, श्रमीकनगर, श्रीनगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज बबन पवार (रा. स्मशान भूमीजवळ, घरकुल शेजारी, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदानंद यांच्याकडे मारुती ईर्टिगा कार (एम एच 14 / सी एक्स 2888) आहे. आरोपी मनोज हा फिर्यादी सदानंद यांच्या तोंडओळखीचा आहे. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांची कार विकत घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतो असे सांगितले. त्यासाठी 3 लाख 58 हजार 275 रुपये किंमत ठरविण्यात आली. सदानंद यांनी आरोपी मनोज याला कार दिली. मात्र आरोपीने कार खरेदी केली नाही. पैसे दिले नाहीत. बँकेचं हप्ते देखील भरले नाहीत. याचा जाब फिर्यादी सदानंद यांनी आरोपी मनोज याला विचारला असता आरोपीने ‘मी तुला कार देणार नाही. बँकेचे हप्ते देखील भरणार नाही. तुला काय करायचे ते कर’ असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपीने फिर्यादी यांना कार परत न करता त्याचा अपहार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मडके तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.