Wakad Crime News : कोविड सेंटरमधील रुग्ण आणि मृतांचे दागिने चोरणारी महिला अटकेत

एमपीसी न्यूज – बाणेर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे आणि मयत झालेल्या रुग्णांचे सोन्याचे दागिने चोरले. ही बाब उघडकीस आली असून वाकड पोलिसांनी चोरट्या महिलेसह तिच्या साथीदाराला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

शारदा अनिल आंबिलठगे (वय 36, रा. गुरुदत्त कॉलनी, रहाटणी फाटा, रहाटणी, पुणे), अनिल तुकाराम संगमे (वय 35, रा. गंगानगर, रहाटणी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड सेंटरमध्ये दाखल असणारे रुग्ण आणि मयत रुग्णांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, कोविड सेंटरमधील रुग्णांचे चोरलेले दागिने विक्रीसाठी एक महिला आणि तिचा साथीदार कुणाल हॉटेलजवळ, काळेवाडी येथे येणार आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शारदा आणि अनिल या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून एक जोड सोन्याचे कानातील कुडक्या, एक जोड बाळी, एक सिंगल कुडका, कट केलेले असे 9 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने पोलिसांनी जप्त केले आहेत.

शारदा हिने जम्बो कोविड सेंटर, बाणेर येथे काम करत असताना रुग्णांचे दागिने चोरल्याचे पोलीस तपासात सांगितले. या कारवाईमुळे चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. वाकड पोलिसांनी दोन्ही आरोपींना चतुःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आरोपी महिला शारदा ही जम्बो कोविड सेंटर, बाणेर येथे मागील आठ महिन्यांपासून पेशंट केअर टेकर म्हणून काम करत आहे. त्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणा-या व मयत महिला रुग्णाच्या कानातील सोन्याचे दागीने कटरने कट करुन ती चोरी करत असे. त्यानंतर ते दागिने विक्री करण्यासाठी तिचा साथीदार अनिल याच्याकडे देत असे. आरोपी महिलेने अनेक रुग्ण महिला व मयत महिलांचे सोन्याचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. चतुःश्रृंगी पोलीस अधिक तपास करित आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डीसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, पोलीस अंमलदार बंदु गिरे, राजेंद्र काळे, कल्पेश पाटील, बापुसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, कौतेय खराडे, तात्या शिंदे, महिला अंमलदार सुप्रिया पारसे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.