Wakad Crime : डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना मारहाण

एमपीसी न्यूज – बेशुद्ध अवस्थेत आणलेल्या एका रुग्णाचा डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी मृत्यू झाला. हे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून तोडफोड केली. तसेच रुग्णालयातील कामगारांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता एन. आर. एस. हॉस्पिटल, काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली.

डॉ. नारायण सुरवसे (वय 46, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी करीम शेख, मुक्तार शेख व त्यांचे दोन साथीदार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्यांच्या अन्य 10 ते 15 साथीदारांनी मिळून सलीम शेख या व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत काळेवाडी फाटा येथील एन आर एस हॉस्पिटलमध्ये आणले. सलीम शेख यांचा डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी मृत्यू झाला होता. त्याबाबत डॉक्टरांनी सोबतच्या नातेवाईकांना कळवले.

यावरून नातेवाईक करीम शेख, मुक्तार शेख आणि त्यांच्या सोबतचे दोन इसम यांनी हॉस्पिटलमध्ये मोठमोठ्याने आरडाओरडा, शिवीगाळ करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. हॉस्पिटलचे सुरक्षा रक्षक, सिस्टर आणि सफाई कामगारांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

आरोपींनी हॉस्पिटलमध्ये घुसून इसीजी मशीन फोडून तीन लाख रुपयांचे नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.