Wakad Crime : भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून महिलेची 20 लाख 81 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तीन जणांनी मिळून भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून महिलेकडून लाखो रुपये घेतले. त्यातील काही रक्कम महिलेला परत देऊन भागीदारी बंद करू असे सांगितले. भागीदारी बंद केल्यानंतरही आरोपींनी व्यवसाय सुरु ठेवला. तसेच महिलेचे उरलेले पैसे आणि व्यवसायातून झालेला नफा अशी एकूण 20 लाख 81 हजार 252 रुपयांची फसवणूक केली.

पुष्कर मिश्रा, शिल्पा मिश्रा, सुरज सोमवंशी (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत निहारिका मनीष प्रसाद (वय 39, रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी गुरुवारी (दि. 5) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 9 फेब्रुवारी 2019 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत वाकड येथे घडला. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना भागीदारीत व्यवसाय करू असे सांगितले. व्यवसायासाठी आरोपींनी फिर्यादीकडून 29 लाख 11 हजार 252 रुपये घेतले. त्यातील 11 लाख रुपये फिर्यादी यांना परत केले.

15 जानेवारी 2020 रोजी आरोपींनी भागीदारी बंद करू असे सांगून व्यवसाय सुरु ठेवला. त्यानंतर व्यवसायात झालेला नफा आणि फिर्यादी यांनी दिलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम अशी एकूण 20 लाख 81 हजार 252 रुपयांची फसवणूक केली.

फिर्यादी यांनी पैसे मागितले असता आरोपींनी समक्ष व फोनद्वारे धमकी दिली. शिल्पा हिने ‘माझ्यावर डिप्रेशनची ट्रीटमेंट चालू आहे. मला पैसे मागू नका. मी आत्महत्या करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन. मी यापूर्वी दोन वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून माझ्या वडिलांना पाठवली आहे’ अशी फिर्यादी यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.