Wakad : रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात बेकायदेशीरपणे घुसून महत्वाच्या कागदपत्रांसह रुग्णाला नेले

दशरथ आरडे प्रकरण; आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांविरोधात पोलिसांत तक्रार अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्णाच्या नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे घुसून कोणत्याही परवानगीशिवाय रुग्णालयातून घरी नेले. यासाठी पोलिसांनी रुग्णाच्या नातेवाईकांना मदत केल्याचा आरोप आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाने केला आहे. याबाबत तक्रार अर्ज वाकड पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.

आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, ‘दशरथ शिवाजी आरडे (वय 72) यांना मज्जासंस्थेच्या आजारावरील उपचारासाठी 8 ऑगस्ट रोजी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञांच्या अहवालानुसार त्यांना सिटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या तपासण्या करणे आवश्यक होते. या तपासण्या केल्यानंतर आलेल्या रिपोर्टनुसार समजले की, त्यांना मज्जासंस्थेव्यतिरिक्त आणखी दुसरा काही आजार आहे. त्यासाठी त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याबाबत त्यांची औषधे सुरु होती.

त्यानंतर बुधवारी (दि. 22) रात्री सातच्या सुमारास मोहम्मद अजीज शेख आणि त्यांचा मुलगा एका पोलीस अधिका-यासोबत रुग्णालयात आले. त्यावेळेस दशरथ यांच्यावर पेशंट केअर एरियामध्ये अन्य रुग्णांसोबत उपचार सुरु होते. त्यावेळी शेख यांनी रुग्णालयातील कर्मचा-यांना धक्काबुक्की केली. दशरथ यांचे पूर्ण मेडिकल रेकॉर्ड कोणत्याही परवानगीशिवाय जबरदस्तीने शेख घेऊन गेले. सोबत दशरथ यांनाही घेऊन गेले. दशरथ यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना उपचाराची गरज आहे. याबाबत तक्रार असल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे.

काय आहे दशरथ आरडे प्रकरण ? 

दशरथ आरडे यांना मज्जासंस्थेच्या आजारावरील उपचारासाठी 8 ऑगस्ट रोजी थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. दशरथ यांचा मुलगा संजय यांनी बिलामध्ये सूट मिळण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील कागदपत्रे सादर केली, तरीदेखील रुग्णालय प्रशासनाने बिलाच्या संपूर्ण रकमेची मागणी करून रुग्णाला नातेवाईकांपासून दूर ठेवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. यावरून आदित्य बिर्ला रुग्णालयातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुबे आणि राजेश यांनी संजय यांना पूर्ण बिल भरा अन्यथा त्यांच्या वडिलांना सोडणार नसल्याची धमकी दिली. याबाबत सह धर्मादाय आयुक्त पुणे जिल्हा यांना पत्र दिले असता, सह धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी रेखाला फोन करून संजय यांच्या वडिलांचे दारिद्र्य रेषेखालील शासकीय नियमानुसार बिल करून त्यांना सोडण्यास सांगितले. तरी देखील रेखा आणि राजेश यांनी संजय यांच्या वडिलांना सोडले नाही. तसेच रुग्णालयातील बाऊंसर यांनी नातेवाईकांना संजय यांच्या वडिलांना भेटण्यापासून मज्जाव केला अशी फिर्याद दशरथ आरडे याना मुलगा संजय आरडे यांनी पोलिसांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.