Wakad : वाकड परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 मधील गावठाण परिसरातील रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी चिंचवडच्या भाजप महिला अध्यक्षा भारती विनोदे व ड प्रभाग स्वीकृत सदस्य कांतीलाल भूमकर यांनी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वाकड येथील प्रभाग क्रमांक 25 मधील गावठाण परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. डांबरी रस्त्यावर वारंवार खड्डे पडल्याने रस्ता दुरुस्तीच्या वारंवार तक्रारी महापालिकेकडे केल्या आहेत. मात्र याकडे स्थापत्य विभागाचे दुर्लक्ष आहे.

वाकडच्या प्रभाग क्रमांक 25 मधील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणे, भुजबळ वस्ती ते भूमकर वस्ती हिंजवाडीकडे एम. डी. आर.31 रस्त्याला जोडणारा 30 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे, भुजबळ वस्ती ते हिंजवडी हद्दीपर्यंत विकास योजनेतील 24 व 30 मी रुंदीचा रस्ता विकसित करणे, पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुलापासून हिंजवडी मनपा हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार वाकड परिसरात संपूर्ण रस्ते सिमेंटचे करण्यात येतील, सिमेट रस्त्याच्या कामांचा योग्य तो पाठपुरावा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.