Wakad : उच्चदाब केबल तुटल्याने दोन ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

वारंवार केबल तोडणा-या बजरंगबली कन्स्ट्रक्शन विरुद्ध कारवाई करण्याची महावितरणची मागणी

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातून महावितरणची जाणारी उच्चदाब वाहिनीची भूमिगत केबल बजरंगबली कन्स्ट्रक्शनकडून तोडली गेली. यापूर्वी देखील या कन्स्ट्रक्शन कंपनीने महावितरणची लघुदाब वाहिनी तोडली होती. काम करताना कन्स्ट्रक्शन कडून महावितरणला कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. वारंवार जाणीवपूर्वक वाहिनी तोडली जाते. याचा महावितरणसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे बजरंगबली कन्स्ट्रक्शन विरोधात कारवाई करण्याची मागणी महावितरणकडून वाकड पोलिसांकडे करण्यात आली.

महावितरणच्या ताथवडे शाखेचे सहाय्यक अभियंता प्रकाश नाईकवाडे यांनी याबाबत वाकड पोलिसांना तक्रार अर्ज दिला. त्यात म्हटले आहे की, “बजरंगबली कन्स्ट्रक्शनमार्फत वाकड परिसरात ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. भूमिगत काम करताना कंपनीकडून महावितरणला कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. महावितरणच्या उच्चदाब व लघुदाब असणा-या वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. भूमिगत कामे करताना याबाबतची माहिती महावितरणला देणे आवश्यक आहे.

बजरंगबली कन्स्ट्रक्शनकडून यापूर्वी महावितरणची 22 हजार वोल्ट्स क्षमतेची उच्चदाब व लघुदाब वाहिनी तोडली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकड येथील रिद्धी -सिद्धी हाईटसमोर काम करत असताना पुन्हा महावितरणची केबल तोडण्यात आली. यामुळे वाकड परिसरातील 2 हजार 120 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिक महावितरणच्या कर्मचा-यांवर रोष व्यक्त करतात.

एकदा विद्युत वाहिनी तुटल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी किमान चार तासांचा कालावधी लागतो. तसेच एका केबलसाठी महावितरणला सुमारे 56 हजार रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागतो. तसेच वारंवार केबलची दुरुस्ती केल्यास केबल कमकुवत होते. बजरंगबली कन्स्ट्रक्शनकडून महावितरणला कोणतीही सूचना दिली जात नसल्याने महावितरण आणि परिणामी ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे बजरंगबली कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.