Wakad : घरात अडकलेल्या दीड वर्षाच्या बालकाची सुखरूप सुटका

अग्निशामक दलाची कामगिरी

एमपीसी न्यूज – कडी लागल्याने बेडरूममध्ये अडकलेल्या दीड वर्षीय बालकाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना सोमवारी (ता. 5) दुपारी वाकड येथे घडली.

नवीश नगिना (वय दीड वर्ष, रा. धनराज पार्क, वाकड) असे सुखरूप सुटका केलेल्या बालकाचे नाव आहे.

नवीश याचे आई-वडील दिवाळीची तयारी करण्यात व्यस्त होते. खेळत खेळत नवीश बेडरूममध्ये गेला आणि अचानक रडू लागला. त्यांच्या आई-वडिलांनी बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कडी लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कडी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अग्निशामक दलास कळविले.

घटनेची माहिती मिळताच लिडींग फायरमन भगवान यमगर, प्रतीक कांबळे, विवेक खांदेवाड, आणि महेंद्र पाठक यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी केल्यावर त्यांनी शिडी लावून बेडरूमपर्यंत मजल मारली. मात्र खिडकीला ग्रील असल्याने ते तोडल्याशिवाय आत जाणे शक्‍य नव्हते. यामुळे यांनी मोठ्या बांबूच्या साहाय्याने बेडरुमच्या दरवाजाची कडी काढण्याचा प्रयत्न केला आणि पाचव्या प्रयत्नात त्यांना कडी काढण्यात यश आले. नवीश याची सुखरूप सुटका झाल्यावर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्‍त केला. तसेच नविशच्या आई-वडिलांनी अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.