Wakad Crime News : सिमकार्डच्या केवायसीसाठी अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – सिमकार्डचे केवायसी करण्यास सांगून मोबाईलमध्ये अॅप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर मोबाईलमधून बँकेच्या खात्याचा तपशील चोरून सात लाख 55 हजार 999 रुपये परस्पर काढून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 22 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी चारच्या सुमारास वाकड येथे घडली.

के. एस. नटराजन (वय 67, रा. वाकड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 13) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 9692688426, 9692625124 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना अज्ञात इसमाने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादीच्या मोबाइलवर इंग्रजी भाषेत मेसेज पाठविला. फिर्यादीच्या एमटीएनएल कंपनीच्या सिमकार्डचे केवायसी करावे लागेल, असा मेसेज करून फिर्यादीला फोन करण्यास भाग पाडले.

फिर्यादीने अज्ञात इसमाला फोन केला. त्यानंतर अज्ञात इसमाने फिर्यादीला गुगल प्ले स्टोअरवरून टीम व्हीवर क्विक सपोर्ट हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने अॅप डाऊनलोड केले. अज्ञात इसमाने अॅपमधून सुरवातीला एमटीएनएल कंपनीला 10 रुपये पाठवण्यास सांगितले.

दरम्यान, त्याच माध्यमातून फिर्यादीच्या मोबाइलमधील इंटरनेट बँकिंगचा तपशील चोरी केला. त्यानंतर फिर्यादीच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या बँकेच्या चार खात्यांमधून ऑनलाईन पद्धतीने एकूण सात लाख 55 हजार 999 रुपये परस्पर काढून फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.