Wakad : गॅस एजन्सीचे बनावट गॅस बुकिंग अकाउंट उघडून सिलेंडर बुक करणा-या महिलेला एक लाखाला फसविले
एमपीसी न्यूज – गॅस एजन्सीच्या नावाने बनावट गॅस बुकिंग अकाउंट बनवून सिलेंडर बुक करणा-या महिलेची एक लाख चार हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 2 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नखाते वस्ती, रहाटणी येथे घडला. याप्रकरणी 3 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्याद देण्यात आली आहे.
इंदू जयनारायण दुबे (वय 30, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 7380554984, 9330842178 या मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील सिलेंडर संपल्याने त्यांनी रतन गॅस एजन्सीकडे चौकशी करण्यासाठी ऑनलाईन एजन्सीचा संपर्क क्रमांक तपासला. त्यावेळी अज्ञात इसमांनी रतन गॅस एजन्सीच्या नावाने बनावट गॅस बुकिंग अकाउंट सुरु केले होते. त्यावर संपर्क क्रमांक दिले होते.
फिर्यादी यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता आरोपींनी फिर्यादी यांच्या मोबाईल फोनवर 7380554984, 9330842178 या क्रमांकावरून लिंक पाठवली. त्या लिंकच्या माध्यमातून पाच रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पाच रुपये भरले असता आरोपींनी त्यांच्या एका बँक खात्यातून एक लाख रुपये आणि दुस-या बँक खात्यातून चार हजार रुपये काढून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.