BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : सराफी दुकाने फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल; 21 लाख 55 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

0

एमपीसी न्यूज – शटर उचकटून चोरटयांनी सराफाच्या दुकानातील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड असा 21 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी (दि. 16) सकाळी रहाटणी आणि कस्पटेवस्ती येथे या दोन घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत प्रवीण रामचंद्र देवकर (वय 36, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देवकर यांचे कस्पटेवस्तीत ‘कनक’ नावाने सराफी दुकान आहे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश करीत सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 19 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरटयांनी सीसीटीव्हीच्या डीव्हीआर देखील चोरून नेला आहे.

दुसऱ्या घटनेत मनोहर पुनसिंग चौहान (वय 30, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चौहान यांचे रहाटणी येथील सिंहगड कॉलनीमध्ये ‘अंबिका ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. गुरुवारी पहाटे दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील 2 लाख 40 हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले. या दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3