Wakad : दारू पिण्याची हौस भागवण्यासाठी त्याने चोरल्या दुचाकी; गुन्हे शाखा युनिट चारकडून सराईत चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. त्याने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरल्या आहेत. दारू पिण्यासाठी तसेच मौजमजा करण्यासाठी वाहने चोरल्याची कबुली चोरट्याने दिली आहे.

रवी ऊर्फ राजेश बंडू थोरात (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट चारचे पथक वाकड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार नारायण जाधव यांना माहिती मिळाली की, वाकड परिसरात वाहन चोरी करणारा आरोपी म्हातोबानगर झोपडपट्टी येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रवी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वाहने चोरल्याची कबुली दिली.

रवी याने दारू पिण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी तीन दुचाकी चोरल्या आहेत. तिन्ही दुचाकी त्याने त्याच्या म्हातोबानगर झोपडपट्टी येथील घराच्या समोर असलेल्या विद्युत रोहित्राजवळ लावून ठेवल्या आहेत. चोरलेल्या दुचाकींसाठी तो गि-हाईक शोधत असताना त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 90 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

या कारवाईमुळे वाकड, हिंजवडी आणि निगडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रवी याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 2016 साली दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंढे, आदिनाथ मिसाळ, नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, लक्ष्मण आढारी, गोविंद चव्हाण, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, तुषार काळे, धनाजी शिंदे, अजिनाथ ओंबासे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.