Wakad : धक्कादायक ! एक दिवसाच्या नवजात शिशूला फेकले झाडाझुडुपात

एमपीसी न्यूज – अवघ्या एका दिवसाच्या नकोशा झालेल्या स्त्री जातीच्या शिशूला जन्मदात्यांनी झाडाझुडपात फेकून दिले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 26) सायंकाळी चारच्या सुमारास जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात उघडकीस आली. या शिशुला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी येथील क्षितिज कॉलनी येथील झुडपातून नवजात शिशुच्या रडण्याचा आवाज नागरिकांनी ऐकला. त्याठिकाणी जाऊन पहिले असता एका दिवसाची नवजात मुलगी रडत असल्याचे दिसले. नागरिकांनी वाकड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. तिला उपचारासाठी औंध शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.