Wakad Crime : सीसीटीव्ही कॅमऱ्यावर स्प्रे मारून ज्वेलर्सचे दुकान फोडले

एमपीसी न्यूज – वाकड येथे एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस तपासात चोरट्यांनी केलेला प्रताप समोर आला आहे.

चोरट्यांनी चोरी करताना ज्वेलर्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यावर स्प्रे मारून नंतर चोरी केली आहे. यामुळे सीसीटीव्ही कॅम-यात हा प्रकार कैद झाला असला तरी त्यातून आरोपींची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचण येत आहे.

जयंतीलाल गुलाबदास वैष्णव (वय 44, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैष्णव यांचे सदगुरू कॉलनी, वाकड रोड, वाकड येथे पी. आर. ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी (दि. 20) पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे संरक्षण ग्रील कट करून दुकानाचे सेन्ट्रल लॉक तोडले. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅम-यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. कॅम-याची वायर तोडून टाकली.

त्यानंतर चोरट्यांनी दुकानातून अडीच हजारांचे सोन्याचे वळे, दहा हजारांचे सोन्याचे मणी, दीड लाखांचे चांदीचे पैंजण, दोन हजारांचा सीसीटीव्ही डीसीआर आणि दीड हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 66 हजारांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.