Wakad : डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर एकाच बाजूला सरकावल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज – डांगे चौक येथे सुरु असलेला ग्रेड सेपरेटर एकाच बाजूला जास्त सरकवला असल्याचा आरोप करत ग्रेड सेपरेटरच्या कामाला स्थानिक व्यापा-यांनी विरोध केला आहे. तसेच याबाबत रविवारी (दि. 5) सकाळी व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन केले.

डांगे चौक ते हिंजवडी या मार्गावर डांगे चौकातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. या कामासाठी सुमारे 25 कोटींचा खर्च केला जात आहे. ग्रेड सेपरेटरचे काम 3 ऑगस्ट 2019 पासून सुरु करण्यात आले आहे. या ग्रेड सेपरेटरची लांबी साधारण अर्धा किलोमीटर असून 18 महिने या कामाची मुदत आहे. मात्र, हा ग्रेड सेपरेटर तयार करीत असताना रस्त्याच्या एकाच बाजूला जास्त प्रमाणात खोदकाम सुरु असल्याचा आरोप करीत व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत.

डांगे चौकातील स्थानिक व्यापा-यांकडून या कामाचा विरोध करण्यात येत आहे. याबाबत व्यापा-यांनी निषेध आंदोलन केले. ग्रेडसेपरेटर करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे भूसंपादन करण्यात आले आहे. ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असून हे काम रस्त्याच्या एकाच बाजूला वाढवण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे समांतर भूसंपादन करून ग्रेडसेपरेटर करण्यात यावा. तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे काढून 150 फूट रस्ता मोकळा करावा. प्रशासनातील संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापा-यांनी आंदोलनाच्या वेळी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.