Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणावर सपासप वार करून खून; चौघांना अटक

एमपीसी न्यूज – मित्राच्या आईसोबत दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर सहा जणांनी कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरुणाच्या तोंडावर, डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर गंभीर इजा झाली. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाबाराच्या सुमारास थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

अनिकेत रुपसिंग भाट (वय 21), राहुल उर्फ सुधीर सहदेव झेंडे (वय 22), मेहबूब दस्तगीर पटेल (वय 22), युवराज अशोक शिंदे (सर्व रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर स्वप्नील सागर उर्फ येडके आणि ऋतिक उर्फ ऋषभ रमेश मिश्रा (दोघे रा. थेरगाव) अद्याप फरार आहेत. बाबासाहेब महादेव वडमारे (वय 30, रा. कैलासनगर, थेरगाव) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाखा महादेव वडमारे (वय 28) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाबाराच्या सुमारास मित्राची आई अनिता भाट (वय 45) यांना दुचाकीवर (एम एच 14 / एफ क्यू 3780) घेऊन येत होता. दरम्यान, थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ सहा जणांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये बाबासाहेब आणि अनिता दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी दोघांना काळेवाडी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाबासाहेब याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला चिंचवड येथील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, नातेवाईकांना हल्ल्याबाबत काहीच माहिती नसल्याने डॉक्टरांनी वाकड पोलिसांना अपघाताची खबर दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी बाबासाहेब याचा अपघात झाल्याची नोंद घेतली.

सलग काही दिवस उपचार घेतल्यानंतर बाबासाहेब काही वेळासाठी शुद्धीवर आला. यावेळी त्याने बहीण विशाखा हिला आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. मात्र, विशाखाला माहिती देत असतानाच पुन्हा बाबासाहेब याची शुद्ध हरपली. दरम्यानच्या काळात विशाखाला अनितावर देखील हल्ला झाल्याचे समजले. तिने याबाबत अधिक माहिती घेतली असता या दोघांवर हल्ला झाल्याचे तिला समजले. तिने तत्काळ वाकड पोलिसांना माहिती देत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी विशाखाची फिर्याद घेऊन चार अनोळखी इसमांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

वाकड पोलिसांनी तपास करत या प्रकरणातील चार जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी अनिकेत भाट आणि फिर्यादी विशाखा यांचे मागील सहा महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून अनिकेत याच्या सांगण्यावरून त्याच्यासह अन्य पाच जणांनी मिळून विशाखा यांचा भाऊ बाबासाहेब याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये बाबासाहेबचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे वाकड पोलिसांनी पुन्हा गुन्ह्यामध्ये कलमववाढ करत खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. चार जणांना अटक केली असून दोघेजण अदयाप फरार आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.