BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : तरुणावर खुनी हल्ला; रुग्णालयाकडून पोलिसांना अपघाताची माहिती

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणावर चार अनोळखी इसमांनी खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाबाराच्या सुमारास थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ घडली. या हल्ल्यात तरुण बेशुद्ध पडला. रुग्णालयाला याबाबत पूर्ण माहिती नसल्याने रुग्णालयाकडून वाकड पोलिसांना तरुणाचा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलीस दप्तरी घटनेची नोंद चुकीची झाली. शनिवारी (दि. 20) जखमी तरुण शुद्धीवर आला. त्यानंतर त्याच्यावर खुनी हल्ला झाल्याचे समोर आले.

बाबासाहेब महादेव वडमारे (वय 30, रा. कैलासनगर, थेरगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाखा महादेव वडमारे (वय 28) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब सोमवारी (दि. 15) रात्री सव्वाबाराच्या सुमारास मित्राची आई अनिता भाट (वय 45) यांना दुचाकीवर घेऊन येत होता. दरम्यान, थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ चार अनोळखी इसमांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये बाबासाहेब आणि अनिता दोघेही गंभीर जखमी झाले. नागरीकांनी दोघांना काळेवाडी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाबासाहेब याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला चिंचवड येथील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, नातेवाईकांना हल्ल्याबाबत काहीच माहिती नसल्याने डॉक्टरांनी वाकड पोलिसांना अपघाताची खबर दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी बाबासाहेब याचा अपघात झाल्याची नोंद घेतली.

सलग काही दिवस उपचार घेतल्यानंतर बाबासाहेब काही वेळासाठी शुद्धीवर आला. यावेळी त्याने बहीण विशाखा हिला आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. मात्र, विशाखाला माहिती देत असतानाच पुन्हा बाबासाहेब याची शुद्ध हरपली. दरम्यानच्या काळात विशाखाला अनितावर देखील हल्ला झाल्याचे समजले. तिने याबाबत अधिक माहिती घेतली असता या दोघांवर हल्ला झाल्याचे तिला समजले. तिने तत्काळ वाकड पोलिसांना माहिती देत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी विशाखाची फिर्याद घेऊन चार अनोळखी इसमांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.