Wakad : समता परिषदेच्या शहाराध्यक्षपदाची खांदेपालट 

एमपीसी  न्यूज – समता परिषदेच्या शहराध्यक्षपदी वाकडच्या ऍड .चंद्रशेखर भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा , विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. राजकीय रणधुमाळी लक्षात घेता निवडणूकांच्या तोंडावर महात्मा फुले समता परिषदेच्या शहाराध्यक्षपदाचा तब्बल आठ वर्षांनी खांदेपालट झाला.

या निवडीमुळे महात्मा फुले समता परिषदेचा येत्या निवडणुकांत महत्वाचा वाटा असण्याच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. त्यादृष्टीने समता परिषदेच्या शहराध्यक्षपदी वाकडच्या ऍड .चंद्रशेखर भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या समता परिषदेच्या राज्य कार्यकरिणीच्या सभेत  भुजबळ यांची समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. भुजबळ यांच्या आजपर्यंतच्या ओबीसी चळवळीतील अभ्यासू आणि आक्रमक भाषण तसेच उत्कृष्ट संघटन याची नोंद घेत ही निवड करण्यात आली. त्यामूळे शहरातील ओबीसी समाजातुन समाधान व्यक्त होत आहे.

भुजबळ हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्यावर व्याखान देतात. पुणे, सातारा तसेच अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी ओबीसी चळवळीत आक्रमक भाषणे केली, कार्यकर्त्यांची बांधणी केली, ३ वर्षांपूर्वी नाशिक येथे झालेल्या ‘भुजबळ समर्थक’ मोर्च्याच्या आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता. समता परिषद अध्यक्ष म्हणून सर्वसामान्य ओबीसी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देणार आहे.

ओबीसी वॉर्डातून निवडून येत ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत रस्त्यावर न उतरलेल्या नगरसेवकांना जाब  विचारणारे कार्यकर्ते तयार करणार आहे, त्यासाठी अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील. आपण फक्त ओबीसी आहोत म्हणून ओबीसींच्या वॉर्डात ताम्रपट घेऊन जन्माला आल्यासारखे काही नगरसेवक वागतात त्यांना घरी बसवून प्रामाणिक, ओबीसींच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना आता नगरसेवक म्हणून समता परिषदेचा पाठिंबा असेल. ‘गाव तेथे-समता परिषद असेल, महापालिका  निवडणुकीपूर्वी छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत परिषदेचा एक राज्यस्तरीय मेळावा घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.