Wakad news: सेवा रस्त्याबाबत संकेतस्थळावर तक्रारींचा भडीमार; ‘एनएचए’चे अधिकारी ऑन द स्पॉट!

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचए) अखत्यारीतील वाकड मधील सेवा रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर तक्रारींचा भडीमार केल्यानंतर आज (गुरुवारी) ‘एनएचए’च्या अधिकाऱ्यांनी सेवा रस्त्यांची पाहणी केली. रस्त्याचे काम करून देण्याची ग्वाही देत डायव्हरशनची परवानगी दिल्यास ताथवडे व पुनावळे येथे नवीन पुल बांधून देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे, असे कलाटे यांनी सांगितले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे पालिकेत प्रतिनिधित्व करत असलेल्या वाकडमधून पुणे-बंगळूरु महामार्ग जातो. वाकड, ताथवडे, पुनावळेतील सेवा रस्ता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो.

महामार्गावर वाकड, पुनावळे, ताथवडे येथे बांधलेल्या पुलाखाली दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. वाहतूक कोंडी होते. सेवा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. डांबर उडून गेल्याने खडी वर आली आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेची तक्रार करण्यासाठी कलाटे यांनी नामी शक्कल लढविली.

जिथे खड्डे पडले आहेत. तिथे फलक लावत आम्ही ‘केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत, आपणही करा’ असे नागरिकांना आवाहन केले. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत pgportal.gov.in संकेतस्थळावर तक्रारींचा भडीमार केला. त्यांनतर खडबडून जागे झालेले ‘एनएचए’चे अधिकारी आज घटनास्थळी दाखल झाले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना सोबत घेऊन रस्त्याची पाहणी केली. ‘एनएचए’चे अनिल गोरड, कॅन्सटन्ट टीम लीडर जी. सी.झा, रिलायन्स प्रोजेक्ट मॅनेजर राकेश कोळी, पिंपरी पालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्न गट्टूवार यांच्यासह ताथवडे येथे पुलाखाली साचलेल्या पाण्याची व वाकड, ताथवडे, पुनावळे येथील सेवा रस्त्यामध्ये पडलेल्या खड्यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

हायवे मॅनेजर गोरड यांनी ‘तूर्तास आम्ही काम करून देऊ, आम्हाला डायव्हरशनची परवानगी मिळावी. त्यानंतर आम्ही ताथवडे व पुनावळे येथे नवीन पुल देखील बांधून देण्यास तयार आहोत, असे सांगितले.

एनएचए’चे अधिकारी, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाठपुरावा करण्याच्या सूचना कलाटे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III