Wakad News: रस्ते विकासातील भाजपचा ‘स्पीड ब्रेकर’ राज्य सरकारने हटविला; सत्ताधारी भाजपला झटका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला राज्य सरकारने जोरदार दणका दिला आहे. वाकड येथील रस्ते विकासाला भाजपने घातलेला खो दूर केला आहे. प्रभाग क्रमांक 25 वाकडमधील ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई -बंगळुरू महामार्गाकडे जाणारा 24 मीटर रुंद डीपी रस्ता आणि प्रभागात आवश्यकतेनुसार रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे स्थायी समितीने फेटाळलेले प्रस्ताव विखंडित करण्याच्या अनुषंगाने प्रथमत: निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे वाकड मधील रस्ते विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजपला हा मोठा झटका मानला जात आहे.

याबाबत वाकडचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्य सरकारकडे दाद मागितली होती. नगरविकास खात्याचे उपसचिव सतीश मोघे यांनी पालिकेला पत्र पाठविले आहे.

प्रभाग क्रमांक 25 मधील ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई -बंगळुरू महामार्गाकडे जाणारा विकास आराखड्यातील 24 मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याचा 20 कोटी 33 लाख रुपयांचा आणि प्रभागात आवश्यकतेनुसार रस्ते काँक्रीटीकरण करणे ( 30 कोटी 69) असे 51 कोटी दोन लाख रुपयांचे दोन प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 26 ऑगस्ट रोजीच्या स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवले होते.

या विकासकामांना महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा विरोध होता. सत्ताधारी भाजपने कोणतेही सबळ कारण न देता स्थायी समिती सभेत मतदान घेऊन हे दोनही प्रस्ताव फेटाळले होते.

त्याविरोधात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे दाद मागितली. त्यावर नगरविकास खात्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अभिप्राय मागविला.

कोणतेही कारण न देता स्थायी समितीसभेमध्ये वाकडचे रस्ते विकासाचे प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आले आहेत. याच विषयासारखा रस्ते काँक्रीटीकरणाचा प्रभाग क्रमांक 29 पिंपळेगुरव मधील विषय मंजूर केला आहे.

वाकडमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण संस्था होत आहे. वाकड परिसराचे वेगाने विकसन होत आहे. भविष्यात तेथे होणारी वाहतुकीची निकड लक्षात घेता हे रस्ते विकसित होणे आवश्यक असल्याचा अभिप्राय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता.

_MPC_DIR_MPU_II

हा अभिप्राय लक्षात घेवून स्थायी समितीने मतदान घेऊन, कोणतेही कारण न देता फेटाळलेले रस्ते विकासाचे प्रस्ताव विखंडीत करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन होते. प्रभाग क्रमांक 25 वाकडमधील ताथवडे येथील जीवननगकडून मुंबई -बंगळुरू महामार्गाकडे जाणारा विकास आराखड्यातील 24 मीटर रुंद रस्ता विकसित करणे आणि प्रभागात आवश्यकतेनुसार रस्ते काँक्रीटीकरणाचे प्रस्ताव मार्गी लावावेत.

स्थायी समितीने फेटाळलेले प्रस्ताव विखंडित करण्याच्या अनुषंगाने प्रथमत: निलंबित करण्यात आले आहेत. याबाबत अभिवेदन करावयाचे असल्यास या निर्णयापासून 30 दिवसांच्या आत सरकारला सादर करावे.

या कालावधीत अभिवेदन प्राप्त न झाल्यास या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान याबाबतचे अभिवेदन आयुक्तच करणार आहेत. आयुक्तांनी यापूर्वीच रस्ते विकास महत्वाचा असल्याचा अनुकूल अभिप्राय दिला आहे. त्यामुळे वाकड येथील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वाकडच्या रस्ते विकासावरुन भाजपमध्ये पडली होती फूट !

वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 25 मधील रस्ते विकास कामाचे सुमारे 75 कोटी रुपये तर शाळा इमारत बांधण्याचा सुमारे 24 कोटी रुपयांचा असे एकत्रित 100 कोटीचे विषय आयुक्तांनी स्थायी समिती सभेसमोर ठेवले होते. आयुक्तांनी मांडलेल्या या चारही प्रस्तावांना भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी विरोध केला होता.

ताथवडे येथील शनिमंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणा-या 30 मीटर रूंद रस्त्याच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. या मतदानावरून भाजप नगरसेवकांमध्ये उभी फूट पडली होती. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे गटाने कलाटे यांच्या बाजूने मतदान केले होते.

मतदान घेऊन कलाटे यांनी दोन प्रस्ताव मंजूर करुन घेत आमदार लक्ष्मण जगताप यांना धोबीपछाड दिला होता. त्यानंतर भाजपने वाकड येथील दोन प्रस्ताव फेटाळले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.